बनावट लायसन्स प्रकरणी एकावर गुन्हा

0
278

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – बनावट लायसन्स तयार करून शासनाची फसवणूक केली. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून टेम्पो चालवल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सावतामाळी मंदिर ते भुजबळ चौक, हिंजवडी येथे घडला आहे.

प्रकाशकुमार महेश्वर महतो (वय 18, रा. देशमुखवाडी, शिवणे. पुणे. मूळ रा. हजारीबाग, झारखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत हिंजवडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशकुमार हा सावतामाळी मंदिर ते भुजबळ चौक हिंजवडी या मार्गावर वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने त्याचा टेम्पो (एम एच 12 / एस एफ 1845) घेऊन जात होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो न थांबता भरधाव वेगात निघून गेला.

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन लायसन्स आणि वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये प्रकाशकुमार याचे लायसन्स बनावट असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याने बनावट लायसन्स तयार करून त्याचा वापर करून पोलिसांची व शासनाची फसवणूक केली आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून टेम्पो चालवला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.