Pune

बनावट मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्याला अटक

By PCB Author

May 15, 2022

पुणे: दि. १५(पीसीबी) – रोख १० हजार रुपये घेऊन बनावट मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधीपथकाने पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

कल्पेश रमेश बोहरा (वय-४२, रा. नम्रता सदन, खामगाव, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १० बनावट मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपीच्या संगणकात देखील अनेक बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड आढळली आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी मधुकर तुपसौंदर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश बोहरा हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. त्याचबरोबर आरोपी नागरिकांना बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देत होता. आणि नागरिकांकडून बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्यासाठी पैसे घेत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली.

पोलिसांनी आरोपी कल्पेश बोहरा याच्याकडे १० बनावट मतदान ओळखपत्र मिळून आली आहेत. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून संगणक जप्त केला असून त्यामध्ये देखील बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तसेच काहीजणांची छायाचित्रे आढळून आली आहेत.

दरम्यान, आरोपी बोहरा बनावट मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये घेत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.