बनावट चावीच्या सहाय्याने एटीएम उघडले; पण पैश्यांऐवजी ‘हि’ गोष्ट चोरली

0
409

चाकण, दि. २७ (पीसीबी) – चोरटे एटीएम मध्ये चोरी करत एटीएम मशीन ऐवजी एटीएम सेंटरमधील अन्य साधने चोरण्यावर भर देत आहेत. मागील आठवड्यात दिघी येथे अज्ञात चोरट्यांनी एटीएम मधून बनावट चावीच्या सहाय्याने मशीन उघडून सीपीयु आणि एस अॅंड जी कंपनीचे लॉक चोरून नेले. आणखी असाच एक प्रकार म्हाळुंगे येथे उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मधून आठ बॅटरी चोरून नेल्या आहेत.

गणेश नामदेव करमारे (वय 37, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे इंगळे येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. 18 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश केला. एटीएम रूमच्या पाठीमागे असलेल्या बॅकरूमचे लॉक बनावट चावीच्या सहाय्याने उघडले. बॅकरूममध्ये लोखंडी रॅकवर ठेवलेल्या 42 हजारांच्या आठ बॅट-या चोरून नेल्या. याबाबत 26 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

24 सप्टेंबर रोजी माऊलीनगर, दिघी आणि वडमुखवाडी च-होली येथे एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. या दोन एटीएम सेंटरमध्ये बनावट चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी एटीएम मशीन उघडून त्यातून सीपीयु आणि एस अॅंड जी कंपनीचे लॉक असा एकूण एक लाख रुपयांचा माल चोरून नेला. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चोरटे आता एटीएम मशीन फोडून रोकड न चोरता एटीएम सेंटरमधील अन्य साहित्य चोरून नेत आहेत. चोरटे बनावट चावीच्या सहाय्याने हे प्रकार करत असल्याने माहितीतील व्यक्तींकडून तर हे चोरीचे प्रकार केले जात नाहीत ना, अशी शंका उपस्थित होते आहे. पोलीस याबाबत तपास करीत आहेत.