बनावट कागदपत्रे सादर करून विवाह केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या आई, वडिलांवर गुन्हा दाखल

0
255

भोसरी, दि. 26 (पीसीबी) : अल्पवयीन असताना देखील बारावीचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून 18 वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यानुसार एका मुलीसोबत त्याने विवाह केला. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 सप्टेंबर रोजी अगस्ती मंगल कार्यालय, आळंदी येथे घडला.

अल्पवयीन मुलगा, त्याची आई आणि वडील यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 25 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाने तो अल्पवयीन असताना बारावीचा शाळा सोडल्याचा दाखवला बनावट तयार करून त्याची झेरॉक्स प्रत मंगल कार्यालयात सादर केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या 18 वर्षीय मुलीची फसवणूक करून तिच्यासोबत विवाह केला. त्यानंतर आरोपीने बनावट शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे एमआयडीसी भोसरी पोलिसांसमोर देखील सादर केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत