Pimpri

बनावट कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर करून शासनाची फसवणूक

By PCB Author

March 03, 2021

मोशी, दि.३ (पीसीबी) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बनावट कागदपत्रे सादर करून सहा जणांनी मिळून शासनाची फसवणूक केली. ही घटना ७ नोव्हेंबर २०१४ ते २ मार्च २०२१ या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे घडली.

संदीप सुरेश कांबळे (वय ५२, रा. जुना काटे पिंपळे रोड), सागर मारुती सूर्यवंशी (रा. पिंपरी कॅम्प), अमर मुलचंदानी (रा. पिंपरी), विनय विवेक आ-हाणा, अश्विन अशोक कामत (रा. ४९, रा. लुल्लानगर, वानवडी), भल्ला महादेव कांबळे (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रसाद पांडुरंग नलावडे यांच्या राहण्याच्या पत्त्याचा पुरावा म्हणून बनावट भाडे करारनामा आरटीओ कार्यालयात सादर केला. हा भाडे करारनामा बनावट असल्याचे हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी हा भाडे करारनामा आरटीओ कार्यालयात सादर करून एम एच १२ / ए क्यू ००११ आणि एम एच १४ / ई के ७७७७ या वाहनांचे हस्तांतरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.