बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून कर्ज घेत 73 लाखांची फसवणूक

0
341

वाकड, दि. १९ (पीसीबी) – बनावट कागदपत्रांच्या आधारे एका फ्लॅटवर 64 लाख रुपयांचे कर्ज घेतले. तो फ्लॅट अन्य एका व्यक्तीला कर्जाची माहिती न देता विकला. त्यानंतर तोच फ्लॅट कोलॅटरल सिक्युरिटी ठेऊन त्यावर साडेनऊ लाखांचे कर्ज घेत एकूण 73 लाख 50 हजारांची बँकेची फसवणूक केली. ही घटना 18 जानेवारी 2018 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत साऊथ इंडियन बँक, कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

याप्रकरणी बँक मॅनेजर निकिता गिरीश राऊत (वय 31) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू रामदास घुगे, प्रिया विष्णू घुगे, प्रवीण शिंदे (तिघे रा. बळीराज कॉलनी, रहाटणी), आशिष अभय पोतदार, अनुष्का आशिष पोतदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू आणि प्रिया यांनी प्रवीण शिंदे याच्या मदतीने आशिष आणि अनुष्का यांच्या चिंचवड येथिल फ्लॅटवर गृहकर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे फिर्यादी काम करत असलेल्या साऊथ इंडियन बँकेकडून 64 लाख रुपयांचे कर्ज घेतले.

फ्लॅट बँकेकडे गहाण असताना बँकेच्या परस्पर आरोपींनी तो फ्लॅट कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला विकला. आरोपींनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आपसात वाटून घेतली. बँकेच्या कर्जाचा परतावा आरोपींनी केला नाही. तसेच कर्ज घेतलेला फ्लॅट पुन्हा कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून बँकेकडे ठेऊन बँकेकडून आणखी साडेनऊ लाख रुपयांचे ओव्हर ड्राफ्ट कर्ज घेतले. यामध्ये आरोपींनी बँकेची एकूण 73 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत.