बदली खेळाडूंमुळे जमशेदपूरचा मुंबईला धक्का

0
247
Boris Singh Thangjam of Jamshedpur FC score goal during match 100 of the 7th season of the Hero Indian Super League between Jamshedpur FC and Mumbai City FC held at the Tilak Maidan Stadium, Goa, India on the 20th February 2021 Photo by Deepak Malik / Sportzpics for ISL

वास्को (गोवा), दि. 21 (पीसीबी) – हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शनिवारी जमशेदपूर एफसीने मुंबई सिटीला 2-0 असा पराभवाचा धक्का दिला. दोन्ही गोल बदली खेळाडूंनी केले. जमशेदपूरच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा कागदावर कायम आहेत, तर मुंबई सिटीच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविण्याच्या आशांना धक्का बसला.

वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. मध्यंतरास उभय संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. जमशेदपूरने खाते दुसऱ्या सत्रात 72व्या मिनिटाला खाते उघडले. बचाव फळीतील मणीपूरचा 21 वर्षीय बदली खेळाडू बोरीस सिंग थांगजाम याने हा गोल केला. त्यानंतर भरपाई वेळेत आघाडी फळीतील स्पेनचा 30 वर्षीय बदली खेळाडू डेव्हिड ग्रँडे याने जमशेदपूरचा दुसरा गोल केला.

जमशेदपूरने 19 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून सहा बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 24 गुण झाले. त्यांनी बेंगळुरू एफसीला मागे टाकून सहावे स्थान मिळविले, मात्र बेंगळुरूचा त्यांच्यापेक्षा एक सामना कमी झाला आहे. जमशेदपूरची एकच लढत बाकी आहे. गुणतक्त्यात तीन ते पाच अशा तीन क्रमांकांवरील हैदराबाद, गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांची 18 सामन्यांतून 27 गुण अशी समान कामगिरी आहे. तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत. त्यांचा गोलफरक अधिकमध्ये आहे. बेंगळुरूचेही एकूण दोन सामने बाकी आहेत. जमशेदपूरचा गोलफरक अद्याप उणे 2 (18-20) आहे. बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की झालेल्या मुंबईला 18 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. दहा विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 34 गुण व दुसरे स्थान कायम राहिले. एटीके मोहन बागान संघापेक्षा ते पाच गुणांनी मागे आहेत. एटीकेएमबीचे 18 सामन्यांतून 39 गुण आहेत.

जमशेदपूरने खाते आधी उघडले. हा गोल कॉर्नरवर झाला. मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने गोलपोस्टजवळ आघाडी फळीतील फारुख चौधरीला मैदानालगत क्रॉस पास दिला. फारुखने त्यावर प्रयत्न केला, पण मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने खाली वाकत चेंडू थोपविला, पण टप्पा पडून चेंडू बोरीस याच्या दिशेने गेला. बोरीसने मग फिनिशींग केले. जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी 68व्या मिनिटाला मध्य फळीतील सैमीनलेन डुंगल याच्या जागी बोरीसला मैदानावर उतरविले होते.

भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला मॉनरॉय याने मध्यरक्षक इसाक वनमाल्साव्मा याच्या साथीत चाल रचली. डेव्हिडला त्यानेच पास दिला. डेव्हिडने दमदार फटका मारत अमरींदर याच्या बाजूने चेंडू नेटमध्ये घालविला. ग्रँडे 84व्या मिनिटाला आघाडी फळीतील नेरीयूस वॅल्सकीस याच्याऐवजी मैदानात उतरला होता. पहिल्या सत्रातील खेळ निर्णायक ठरला नाही. पाचव्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक इसाक वनमाल्साव्मा याने डावीकडून आगेकूच केली. प्रतिस्पर्धी मध्यरक्षक जॅकीचंद सिंग त्याला रोखण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे उजव्या पायाने क्रॉसशॉटवर चेंडू गोलक्षेत्रात मारला. त्यावर स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याने हेडिंग केले, पण मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने चपळाईने बचाव केला.

पूर्वार्धात 33व्या मिनिटाला मुंबईला फ्री किक मिळाली. मध्य फळीतील अहमद जाहू याने गोलक्षेत्रात चेंडू मारला. वॅल्सकीनसने हेडिंगवर चेंडू बाहेर घालविला. त्यामुळे मुंबईला कॉर्नर मिळाला. बचावपटू मंदार राव देसाई याने त्यावर फटका मारला, पण तो अडविला गेला. चारच मिनिटांनी 37व्या मिनिटाला मुंबईची फ्रि किक जाहूनेच घेतली. त्यावर बचावपटू मुर्तडा फॉल याने जमशेदपूरचा बचावपटू पीटर हार्टली याला चकवून हेडिंग केले, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला