बडोद्यामध्ये पाणीपुरी विक्रीवर बंदी; बडोदा महापालिकेचा निर्णय

0
717

बडोदा, दि. २७ (पीसीबी) – बडोद्यामधील पाणीपुरीच्या विक्रीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. बडोद्यात गोलगप्पा नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणीपुरीवर सध्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा शिक्का मारत महापालिकेने बंदी घातली आहे. पाणीपुरी बनवण्याची पद्धत आरोग्याला हानीकारक असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे.

पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. याच कालावधीच विविध रोगांच्या साथी फैलावतात आणि त्या नंतर पालिकांसाठी डोकेदुखी बनतात. सध्या ज्या प्रकारे पाणीपुरी बनवल्या जातात ते बघितले तर या वातावरणात टायफॉइड, कावीळ व विषबाधेमुळे होणारे रोग बळावतील. त्यामुळे सध्या पाणीपुरीच्या विक्रीला बंदी घालत असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

पाणीपुरी विकण्यात येणाऱ्या अनेक गाड्यांवर, दुकानांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले व त्यांना अत्यंत अपायकारक पद्धतीने पाणीपुरी बनवले जात असल्याचे आढळले, असे सांगण्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्यविभागाने यावेळी जप्त केलेले हजारो किलोंचे सामान फेकून दिले आहे. खराब झालेले पीठ, सडलेले बटाटे, घाणेरड तेल व दुर्गंधीयुक्त पाणी यांचा यात समावेश आहे.