Maharashtra

बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणे असल्याचे वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे

By PCB Author

February 08, 2020

कोल्हापूर, दि.८ (पीसीबी) – बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणे असल्याचे वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा ८० टक्के फायदा होणार आहे. तसेच ही कर्जमाफीअंतिम नसून, हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा-जसा पैसा येईल तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतली जाणार आहे. मात्र असे असूनही, बच्चू कडू ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारची कर्जमाफी त्यांना बुजगावणे असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला सत्तार यांनी यावेळी दिला.

राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काल बुलडाण्याच्या जळगाव जामोद याठिकाणी ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणाऱ्या सरकारच्या विरोधात उपविभागीय कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला.यावेळी बोलताना शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही. द्यायचे नाही तर लोकांना फसवता का? गंडवता का? असे म्हटले आहे. रोज १० शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर प्रहार केला. मुख्यमंत्री व्हायच्या आधी मी शेतकऱ्यांना तुम्हाला चिंतामुक्त करतो, कर्जमुक्त करतो, सातबारा कोरा करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता गावातील ५ लोकांनाही जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा मिळत नसल्याचे शेट्टी म्हणाले. हे सरकार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचेही शेट्टी म्हणाले.