बंधु च्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावणार का?

0
581

मुंबई, दि.२७ (पीसीबी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली. या शपथविधीला उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे कुुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे.

उद्धव ठाकरे हे स्वत: राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यामधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्किंगवरुन पुन्हा एकदा दबक्या आवाजात आता तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवे अशी मागणी होऊ लगाली होती. यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले होते. मात्र आता थेट राज यांना उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देणार असल्याचे समजते. आज संध्याकाळच्या सुमारास ते राज यांची भेट घेऊन अथवा फोनवर या सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात आमंत्रण देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उद्धव यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी ही माहिती दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित राहावं अशी इच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.