बंद दरवाजाआड होणार इंडियन ओपन

0
370

नवी दिल्ली, दि.१४ (पीसीबी) : करोनाच्या संकटकाळाचा परिणाम होत असला, तरी बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्राय स्पर्धा ठराविक अंतराने होत आहेत. पुढील महिन्यात इंडियन ओपन बॅडमिटंन स्पर्धा होणार असून, ऑलिंपिक चॅंपियन कॅरोलिना मरिन आणि अव्वल मानांकित केंटो मोमोटा यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंनी या स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.

पुढील महिन्यात ११ मेपासून सुरू होणारी ही स्पर्धा अर्थातच बंद दरवाजाआड खेळविण्यात येणार आहे. ऑलिपिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी शिल्लक असलेल्या मोजक्या पात्रता फेरीतील ही एक स्पर्धा असल्याने या स्पर्धेचे महत्व वाढले आहे. एकीण ४ लाख डॉलर पारितोषिक रकमेच्या या स्पर्धेसाठी ३३ देशांतून ११४ पुरुष आणि ११४ महिला अशा २२८ खेळाडूंनी आपल्या प्रवेशिका पाठविल्या आहेत.

भारतीय बॅडमिंटन संघटनेने स्पर्धा कोविड १९ साठी घालून देण्यात आलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि सुरक्षेच्या अटी पाळून खेळविली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. देशातील वाढत चाललेला संसर्ग लक्षात घेता स्पर्धा पूर्णपणे जैव सुरक्षा कवचाखालीच होणार आहे. सर्व लढती या बंद दरवाजाच्या आडच होतील आणि प्रेक्षकांसह प्रसार माध्यमांनाही प्रवेश नसेल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, आखात आणि युरोपियन देशातून येणाऱ्या सर्व खेळाडूंना सात दिवसांचे विलगीकरण अनिवार्य असेल. यासाठी सर्व खेळाडू आणि पदाधिकारी आणि तंत्रज्ञ यांना ३ मे पर्यंत नवी दिल्ली यावेच लागेल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. याखेरीज उर्वरित देशातील खेळाडू ६ मे पर्यंत येऊ शकतात. त्यानंतर चार दिवस त्यांना विलगीकरणात रहावे लागेल.

भारताचे सर्वात मोठे ४८ खेळाडूंचे पथक असेल.त्यानंतर मलेशियाने २६ खेळाडूंचे पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे १० खेळाडू सहभागी होतील.

महिला विभागात कॅरोलिन मरिन, अकाने यामागुची, पी.व्ही. सिंधू, कोरियाची अॅन से यंग आणि थायलंडची पॉर्नपावी चोचुवॉंग, तर पुरुष विभागात केंटो मोमोटा, गतविजेता व्हिक्टर अॅक्सेल्सेन, आंद्रेस अॅन्टोनसेन, सध्याचा ऑल इंग्लंड विजेता झी जिया ली या प्रमुख खेळाडूंचा खेळ या वेळी बघायला मिळणार आहे. पुरुष विभागात भारताच्या आशा किदांबी श्रीकांत, बी.साईप्रणित, एचएस प्रणॉय, पी. कश्यप यांच्यावर असेल.

दुहेरीत भारताला संधी असून, चिराग शेट्टी-सात्विकसाईरा रंकीरेड्डी, अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांच्यावर भारताच्या आशा असतील. महिला विभागातून अश्विनी-एन सिक्की ऑलिंपिक पात्रतेचा प्रयत्न करतील. मिश्र दुहेरीत जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा स्थानावरील सहा जोड्या या स्पर्धेत खेळणार असून, यामध्ये युता वॅटानाबे आणि अरिसा हिगाशिनो या जपानी जोडीला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

स्पर्धेतून माघार घेण्यासाठी १९ एप्रिल अखेरची तारीख असून, २० एप्रिल रोजी ड्रॉ काढला जाईल. स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडू,पदाधिकारी, तंत्रज्ञ यांची दिल्ली सरकारच्या वतीने आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी दिल्लीत आल्यावर ३ आणि ६ मे रोजी आणि नंतर ९ आणि १४ मे रोजी होणार आहे.