‘बंद खोलीतील बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’: मनसे नेत्याचा आरोप

0
266

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासह राज्यातील इतर महत्वाच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीत गेले होते. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. राज्यातील विषयांवर या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक खासगी बैठकही झाली. याच बैठकीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे. आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको, असे संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यावरून प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांवरच संतापले. मोदींनाच भेटलो. मी काही नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले होते.