बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

0
531

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – वांद्रे पूर्व मधील बंडखोर तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्राकाद्वारे हकालपट्टी करण्यात आली आहे. मातोश्रीच्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्वमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती.

भाजपाने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतही कारवाईची सूत्रे हलली आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर शिवसेनेमध्ये तिकिट न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराविरोधात तर काही ठिकाणी युतीमधील मित्रपक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे.

आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना ह्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकवत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, “वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने इतिहास घडवला आहे. जे बंडखोरी करतील, ते इतिहासजमा होतील”, असं स्पष्ट मत शिवसेना विभागप्रमुख, आमदार ऍड अनिल परब यांनी व्यक्त केलंय. “गेली ३० वर्षं एक शाखाप्रमुख ते महापौर असा राजकीय प्रवास मी वांद्रे खार सांताक्रूजमधील लोकांची कामं करतच केला आहे. लोकांचा माझ्यावर आणि त्यापेक्षाही जास्त शिवसेनेवर विश्वास आहे. त्यामुळे मी नक्की जिंकून येईन” असा विश्वास उमेदवार प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने मंगळवारी नांदेड, हदगाव, चंदगड, बुलडाणा आदी १४ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या १९ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला होता.