बंगळुरू आयआयटीच्या विद्यार्थ्याला गुगलचे वार्षिक १ कोटी २० लाखांचे पॅकेज; डेटा सायंटिस्ट व्हा, करिअर उज्ज्वल बनवा

0
442

बंगळुरू, दि. ९ (पीसीबी) – बंगळुरू येथील आयआयटीच्या २२ वर्षांच्या एका विद्यार्थ्याला गुगलने वार्षिक १ कोटी २० लाखांचे पॅकेज दिले आहे. गुगलने डेटा सायन्सचे काम करण्यासाठी जगभरातून  ५० विद्यार्थ्यांना निवडले आहे. त्यामध्ये बंगळुरू आयआयटीच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.
आदित्य पालीवाल असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा मुंबईचा आहे. त्याने बंगळुरू आयआयटीमध्ये एमटेकचे शिक्षण घेतले आहे. त्याला डाटा सायन्सचे काम करण्यासाठी गुगलने वार्षिक १ कोटी २० लाखांचे पॅकेज दिले आहे. तो अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन विभागात (आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च विंग) १६ जुलैपासून रुजू होणार आहे.
गुगलने कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन विभागातील पदभरतीसाठी नुकतीच चाचणी परीक्षा घेतली. त्यात जगभरातील सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील केवळ ५० विद्यार्थी निवडण्यात आले. त्यामध्ये आदित्य पालीवल या विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्याला गुगलने वार्षिक १ कोटी २० लाखांचे पॅकेज दिले आहे. संगणकीय भाषा कोडिंगसाठी घेण्यात येणाऱ्या एसीएम इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रॅमिंग स्पर्धेतील आदित्य हा अंतिम स्पर्धक होता.
डेटा सायन्स म्हणजे काय
माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे “डेटा”ला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. आजघडीला जवळपास सर्वच संस्था स्वत:ला डेटा संकलित करण्याच्या पद्धतीत बदल करून घेत आहेत. बाजारपेठेतील उत्पादनातील स्पर्धेचे आकलन करायचे असो किंवा निवडणूक निकालाचा कल जाणून घ्यायचा असो, डेटा संकलनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. असे असताना काही कंपन्यांकडे डेटांसंदर्भातील माहितीचा अभाव आणि कुशल व्यावसायिकांच्या कमतरतेमुळे डेटा संकलन करण्यात अडचणी येत आहेत. जागतिक पातळीवर डेटा सायंटिस्ट किंवा अॅडव्हान्स्ड अॅनालिस्टची मागणी सर्वाधिक वाढली आहे. या मागणीत २०२० पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
आजच्या युगात गणित, सांख्यिकी, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, आर, पायथन, एसक्यूएल, एसएएसबरोबरच हाडोप आणि स्पार्कसारखे मोठ्या प्रमाणातील डेटा टूल्स आणि कांगोनोस, टॅब्लो, क्लिक व्यूसारखे व्हिज्युअलायजेशन टूल्सच्या माध्यमातून या क्षेत्रातील सखोल माहिती आणि व्यावहारिक कौशल्याने पारंगत असलेल्या डेटा सायंटिस्टची मागणी वाढली आहे. डोमेन नॉलेजचा वेगाने प्रसार होत आहे. आज दूरसंचार, आयटी, विमा, निर्गुंतवणूक, आरोग्य, बँकिंग रिटेल, मिडिया, ई-कॉमर्स, तेल, गॅस, ऑटोमोबाईल, एअरलाइन्स, सरकार, स्वयंसेवी संस्था आणि स्टार्टअप यांसारख्या जवळपास सर्वच उद्योगांत एआय, एमएलए, डीप लर्निंग, डेटा सायन्सची मागणी भारतातच नव्हे तर जगातही वाढली आहे.
जगभरात डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि एआयवर आधारित कुशल तंत्रज्ञानाला मागणी वाढली आहे. मात्र, या योजनांना काही ठिकाणी कौशल्याने आणि यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होताना दिसून येत नाही. जागतिक पातळीवर डेटा सायंटिस्ट आणि अॅडव्हान्स्ड अॅनालिस्टची मागणी सर्वात जास्त आहे. कंपन्या या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आकर्षित करण्यासाठी भरघोस वेतन देण्यास नेहमीच तयार असतात. डेटा सायंटिस्ट हा कॉम्प्युटरमध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करतो. डेटा सायंटिस्ट होण्यासाठी शिक्षणाची अट नाही. कोणत्याही क्षेत्रात काम करणारा डेटा अॅनालिस्टचे प्रशिक्षण घेऊ शकतो. भारत हा कुशल डेटा सायंटिस्टचे जगातील मोठे केंद्र बनण्यासाठी सक्षम आहे, असे चित्र आहे.