बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक केल्याने पुणे पोलीस अडचणीत

0
571

पुणे, दि. २३ (पीसीबी) – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य  कर्ज दिल्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक करणारे पुणे पोलीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. अटक करताना पोलिसांनी  नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकाराखाली ‘एमपीआयडी’ कलमाखाली बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांवर अटकेची कारवाई केली. परंतु कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेच्या आजी-माजी अध्यक्षाविरुद्ध कारवाई करताना आधी  रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे पोलिसांनी रिझर्व्ह बँकेला याची माहिती न देताच ही कारवाई केली. यामुळे हे प्रकरण आता पोलिसांना  चांगलेच महागात पडणार आहे.

त्याचबरोबर याप्रकरणात पोलिसांनी पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांनाही अंधारात ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गृहविभागाची गोची झाली आहे. मोठी कारवाई करण्यापूर्वी पुणे पोलिसांनी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कल्पना दिलेली नाही, त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सांगितले जात आहे.