फ्रान्स विरोधात मुस्लिम राष्ट्र एकवटली

0
578

इराण, दि. २८ (पीसीबी) – प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबतची व्यंगचित्रे प्रदर्शित करण्यास पाठिंबा देणाऱ्या फ्रान्सचा इराणने निषेध केला असून फ्रान्सच्या राजनैतिक अधिकाऱ्यास बोलावून या सगळ्या प्रकाराबाबत नापसंती व्यक्त करण्यात आली.

इराणच्या दूरचित्रवाणीने म्हटले आहे की, चेचेन वंशाच्या मुलाने महंमद पैगंबराची व्यंगचित्रे दाखवून चर्चा करणाऱ्या शिक्षकास ठार केले, हे खरे असले तरी फ्रान्सने त्यावर दिलेली प्रतिक्रिया शहाणपणाची नव्हती. फ्रान्समध्ये इस्लामविरोधात विद्वेष पसरवण्यास मुभा दिली जात असून त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेतला जात आहे, असे फ्रान्सच्या दूतास सांगण्यात आले.

मध्यपूर्वेतील देशांनीही फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गेल्या आठवडय़ात प्रेषित पैगंबराची व्यंगचित्रे दाखवून चर्चा करण्याच्या, ती प्रकाशित करण्याच्या कृत्यांचा निषेध करण्यास नकार दिला होता. पॅरिसमध्ये १६ ऑक्टोबर रोजी पैगंबराची व्यंगचित्रे दाखवून चर्चा करणाऱ्या शिक्षकाचा चेचेन वंशाच्या १८ वर्षीय मुलाने शिरच्छेद केला होता.

इराणच्या कोम या शहरातील धर्मगुरू ंच्या संघटनेने सोमवारी मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून इस्लामी देशांनी फ्रान्सवर आर्थिक व राजकीय निर्बंध लागू करावेत असे म्हटले आहे.सौदी अरेबियाने मंगळवारी म्हटले आहे की, इस्लाम व दहशतवादाचा संबंध जोडण्याच्या संबंधांचा आम्ही निषेध करतो. प्रेषित महंमद पैगंबरांच्या संदर्भात काढलेल्या व्यंगचित्रांचाही धिक्कार करतो. कुवेतमध्ये फ्रान्सची उत्पादने बाजारपेठेतून काढण्यात आली. कतार विद्यापीठाने फ्रेंच संस्कृती सप्ताह रद्द केला आहे. फ्रेंच मालकीच्या कॅरीफोर किराणा दुकानात जाणे बंद करावे असे आवाहन सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातींमध्ये करण्यात आले आहे. इराक, तुर्कस्थान, गाझा पट्टी या भागात निषेध मोर्चे काढण्यात आले.