फ्रान्सच्या अध्यक्षपदी पुन्हा इमॅन्युएल मॅक्रॉन

0
418

पॅरिस,दि. २६ (पीसीबी) : फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. मॅक्रॉन यांनी प्रमुख प्रतिस्पर्धी उजव्या विचारसरणीच्या मरीन ली पेन यांचा पराभव केला आहे. फ्रान्समधील जनतेने उजव्या विचारांना नाकारले आहे. सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवणारे मॅक्रॉन हे मागील वीस वर्षातील पहिलेच नेते आहे.

फ्रान्सची अध्यक्षीय निवडणूक दोन टप्प्यांमध्ये झाली. या निवडणुकीत मॅक्रॉन यांना 58.55 टक्के तर पेन यांना 41.45 टक्के मते मिळाली. फ्रान्समध्ये उजव्या विचारसरणीच्या नेत्याचा पराभव झाला आहे. असे असले तरी पेन यांच्याएवढी मते आतापर्यंत उजव्या विचारसरणीच्या नेत्याला कधीही मिळाली नव्हती. नॅशनल रॅली पक्षाच्या मरीन पेन यांनी हा पराभव म्हणजे आपला विजयच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या अध्यक्षीय निवडणुकीत 72 टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. 1969 च्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एवढे कमी मतदान झाले. सुमारे एक तृतीयांश मतदारांनी मतदानच केले नाही. अनेक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता मतपेटीत कोरीच मतपत्रिका टाकली.