Pune Gramin

फोडाफोडी कशी करायची हे हर्षवर्धन पाटील यांच्याकडून शिकलो – गिरीश बापट

By PCB Author

September 02, 2018

बारामती, दि. २ (पीसीबी) – राज्याच्या संसदीय मंत्र्यांकडे फोडाफोडी  करण्याचे एक अदृश्‍य खाते असते.  फोडाफोडी कशी करायची हे मीदेखील माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडूनच शिकलो आहे,  असा गौप्यस्फोट पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला.  

सांगवी (ता. बारामती) येथे सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांचा सत्कार समारंभ  आयोजित केला होता. यावेळी  बापट यांनी राजकीय टोलेबाजी केली. काँगेस नेते व  माजी संसदीय कार्यमंत्री  हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बापट म्हणाले की,  हर्षवर्धनजी तुम्ही पालकमंत्र्याच्या उपस्थितीत मनमोकळे बोललात. तसे आधी बोलायचा नाही. बहुधा तुम्हाला आधीच्या पालकमंत्र्यांचे दडपण असावे.  बापट यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

हर्षवर्धन पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. मनोहर जोशींच्या काळात त्यांनी सरकारने चांगले निर्णय घ्यावेत, असा आग्रह धरला होता. त्यांच्या अनुभवाचा फायदा संसदीय कामकाज मंत्री बनल्यानंतर मला झाला. आता गुरूची विद्या मी गुरूला देणार आहे, असे बापट म्हणाले.