फैजाबादचे नाव ‘अयोध्या!’ प्रयागराजनंतर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आणखी एक घोषणा

0
915

लखनौ, दि. ६ (पीसीबी) – अयोध्येत दीपोत्सवाची धूमशान सुरू असताना योगी आदित्यनाथ यांनी आणखी घोषणा केली. आजपासून फैजाबादचे नाव अयोध्या असेल असे त्यांनी जाहीर केले. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी यानंतर आणखी काही घोषणा केल्या. त्यामध्ये फैजाबादेत राजा दशरथ यांच्या नावे मेडिकल कॉलेज स्थापित केले जाणार आहे. सोबतच या शहरात प्रस्तावित विमानतळाचे लवकरच काम पूर्ण केले जाणार असून त्याला पुरुषोत्तम असे नाव दिले जाईल असेही योगींनी स्पष्ट केले. योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली त्यावेळी दीपोत्सवात दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जोंग सूक सुद्धा उपस्थित होत्या.

अलाहाबादचे नाव प्रयागराज केल्यानंतर योगींची नामांतरासाठी ही सर्वात मोठी घोषणा आहे. १६ ऑक्टोबरला त्यांनी अलाहाबादचे नामकरण प्रयागराज असे केले. तेव्हापासूनच योगी इंटरनेटवर चर्चेचा विषय आहेत. त्यांच्या नावे विविध प्रकारचे ट्रोल्स आणि Meme तयार करून शेअर केले जात आहेत. त्यातच योगींनी आणखी एक घोषणा करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या घोषणेच्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी नामांतरावर टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले होते. नावात काय असे विचारणाऱ्यांना या देशात नावाला अनन्यसाधारण महत्व आहे असे ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर नावाला महत्व नसेल तर मग असे प्रश्न विचारणाऱ्यांची नावे त्यांच्या पालकांनी रावण किंवा दुर्योधन का ठेवली नाहीत असा सवाल योगींनी केला.