Pune

फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार  

By PCB Author

August 13, 2018

पुणे, दि. १३ (पीसीबी) – ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची  आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आज (सोमवारी) पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.  या प्रकरणी  संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची आज सकाळी भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, राजकीय विरोधातून टीका करण्यास काहीही हरकत नाही; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्दांचा वापर केला जात आहेत. मजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे प्रकार केले जात आहेत.  त्यामुळे हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्याचे अ‍ॅडमिन जे कोणी असतील त्या सर्वांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

आमच्या नेत्यांनी अथवा मी कधीही कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील जनतेमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. त्यासाठी फोटो मॉर्फ केले जात आहेत. या प्रकारामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षातील मान्यवर नेते आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही सुळे यांनी केली.