Desh

फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, ८१ हजार युजर्सचे अकाऊंट हॅक?

By PCB Author

November 03, 2018

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – आधीच डेटा चोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले फेसबुक आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. फेसबुकवरुन युजर्सचा डेटा चोरी केला जात असून, त्याचा चुकीच्या पध्दतीने वापर केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल ८१ हजार युजर्सचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हे सर्व अकाऊंट हॅक करुन युजर्सच्या मेसेज बॉक्समधील खासगी मेसेज विकले जात आहेत. ही माहिती प्रत्येक अकाऊंटमागे ६ रुपये ५० पैशांमध्ये विकली जात आहे. या प्रकारामुळे या प्रकारवर पुन्हा एकदा फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहिती पडताळून पाहण्यासाठी डेटा विकण्यात आलेल्या पाच फेसबुक युजर्सना संपर्क साधला. त्यांच्या नावे असणारे मेसेज दाखवले असता हे आपलेच मेसेज असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे यामध्ये फक्त मेसेज नाही तर फोटोंचाही समावेश होता. ज्या युजर्सचा डेटा विकला जात आहे ते प्रामुख्याने यूक्रेन, रशिया, यूके, अमेरिका आणि ब्राझील देशातील आहेत. इतर देशांमध्येही हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

दरम्यान फेसबुकने सर्व युजर्सचे अकाऊंट्स सुरक्षित असून कोणतीही माहिती लिक किंवा अकाऊंट हॅक झाले नसल्याचे सांगितले आहे.