Desh

फेसबुकचा हाफिज सईदला दणका; डिलिट केले पक्षाचे आणि उमेदवारांचे पेज

By PCB Author

July 15, 2018

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पाकिस्तानामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणारा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद याला आणि त्याच्या उमेदवारांना निवडणुकीआधीच मोठा दणका बसला आहे. सोशल मीडियाचा सर्वाधिक मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने हाफिज सईदच्या मिली मुस्लिम लीग (MML) या पक्षाला मिळालेलं फेसबुक पेज डिलीट केले आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.  

फेसबुकने हाफिज सईदच्या पक्षाच्या उमेदवारांचे आणि त्याच्या पक्षाशी संबंधित अन्य फेसबुक पेजेस डिलिट केले आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन असून आमच्यावर फेसबुकने अन्याय केला आहे, असा आरोप मिली मुस्लिम लीगने केला आहे.

पाकिस्तानमध्ये २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, आणि त्याच पार्श्वभूमीवर फेसबुकनेही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानमधील कोणत्याही दहशतवादी गटाने फेसबुकचा दुरुपयोग करू नये म्हणून हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानमधील कंपनीचे प्रवक्ते सरीम अजीज यांनी माध्यमांना दिली.