Sports

फुटी फर्स्टच्या विजयात ज्योतीचा पंच

By PCB Author

April 04, 2021

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : अनुभवी स्ट्रायकर ज्योती चौहान हिच्या पंचच्या जोरावर फुटी फर्स्ट संघाने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोशिएशनच्या (वायफा) महिला फुटबॉल लीगमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी शनिवारी झालेल्या सामन्यात अम्मा फुटबॉल क्लबचा ७-० असा धुव्वा उडवला. यात ज्योतीने पाच गोल केले.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या ज्योतीनेच आजही त्यांची आक्रमणाची बाजू सांभाळली. फुटी फर्स्ट संघाने पहिल्या सामन्यात पॅकान्गन संघाची १४-० अशी धुळधाण उडवली होती. त्या सामन्यातही ज्योतीनेच मुख्य वाटा उचलताना एकटीने नऊ गोल केले होते. आजही त्यांच्या दुसऱ्या विजयात ज्योतीनेच गोल धडाका लावला. तिच्या आक्रमक खेळापुढे अम्मा संघ जणू आपली ओळखच हरवून बसला होता.

अम्माने पहिला सामना जिंकून चांगली सुरवात केली होती. पण, आज सामन्याची पहिली १८ मिनिटे वगळता नंतर पूर्ण सामन्यात अभावानेच त्यांना चेंडूचा ताबा मिळाला. सामन्याच्या १८व्या मिनिटाला फुटीच्या खेळाडूला धोकादायकरित्या अडथळा आणल्याबद्दल पंचांनी त्यांना पेनल्टी दिली आणि ज्योतीने याचा फायदा उठवत १९व्या मिनिटाला पहिला गोल केला.

त्यानंतर फुटी संघाकडून पूजा मुरे हिने ३३व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. पाठोपाठ ज्योतीने ३८ आणि ४५व्या मिनिटाला दोन गोल करून मध्यंतरालाच संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात अम्माच्या खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्यांना फुटीचा बचाव भेदता आला नाही. ज्योतीने आणखी एक गोल करून आघाडी वाढवतच नेली. सामन्याच्या अखेरच्या १० मिनिटात फुटी संघाने आणखी दोन गोल केले. यातील एक गोल ८१व्या मिनिटाला ममता कुमारीने केला. त्यानंतर ज्योतीने संघाबरोबरच वैयक्तिक गोल संख्या वाढवताना अखेरच्या मिनिटाला आणखी एक गोल केला.

अन्य एका सामन्यात पीफा स्पोर्टस क्लब (कुलाबा) संघाने साताऱ्याच्या पॅकान्गन संघाचा ११-० असा पराभव केला. सस्मिता बेहरा हिने पाच गोल केले. तिला मरबरिन नान्गुम आणि बेटशेबा खार्सिट्यू यांनी प्रत्येकी दोन गोल करत सुरेख साथ केली. रेणु बाला आणि भगवती चौहान यांनी एकेक गोल करताना संघाचे विजयाधिक्य वाढवले.

क्रीडाक्षेत्राच्या घडामोडी आणि रंगणाऱ्या नाट्याची माहिती देणारे मराठीमधील एकमेव स्वतंत्र न्यूजपोर्टल. येथे आपल्याला वाचायला मिळणार खेळाविषयीच्या अनेक घडामोडी त्याच्या विविध अंगांसह.