Sports

फुटबॉल विश्वातील आणखी एक तारा निखळला; पाओलो रॉस्सी याचे निधन

By PCB Author

December 11, 2020

रोम, दि.११ (पीसीबी) – फुटबॉल विश्वातील आणखी एक तारा निखळला आहे. महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, अर्जेंटिनाचे प्रशिक्षक अल्जेंड्रो साबेला यांच्या दुःखातून फुटबॉल विश्व सावरत नाही, तो आज आणखी एक धक्का बसला. इटलीचा फुटबॉल नायक पाओलो रॉस्सी याचे निधन झाले. त्यांचे वय ६४ होते.

इटलीमधील टी व्ही. चॅनेल आरएआय स्पोर्टने त्याच्या निधनाचे वृत्त दिले आहे. मात्र, त्याच्या निधनाचे कारण दिलेले नाही. ऐंशीच्या दशकात फुटबॉलच्या प्रेमात पडायला लावणाऱ्या रॉस्सीचे निधन आज निधन झाले, असे त्यांनी दिलेल्या वृ्त्तात म्हणण्यात आले आहे. चॅनेलच्या वृत्तानंतर रोस्सीची पत्नी फेड्रिका कॅप्पेलेट्टी हिने इन्स्टाग्रामवरून रॉस्सी आणि स्वतःचे एकत्रित छायाचित्र पोस्ट करून त्याच्या निधनाची माहिती दिली. आता कधीच दिसणार नाही, अशी कॅप्शन तिने पोस्ट केली होती.

रॉस्सीच्या कारकिर्दीत १९८२ वर्षे महत्वाचे ठरले. या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने सहा गोल करताना विजेतेपदाबरोबरच सर्वाधिक गोलसाठी गोल्डन बूट आणि स्पर्धेचा मानकरी म्हणून गोल्डन बूट असे तीन पुरस्कार मिळविले. एकाच स्पर्धेत तीनही पुरस्कार मिळविणारा इटलीचा हा एकमेव फुटबॉलपटू ठरला. त्यापूर्वी अशी कामगिरी १९६२ मध्ये गरिंचा आणि १९७८ मारिओ केम्पस या दोनच खेळाडूंना करता आली आहे. पुढे त्याच वर्षी तो बॅलन डी ओर पुरस्काराचा मानकरी ठरला.

रॉस्सीने इटलीच्या व्यावसायिक लीगमधील सिरी ए या स्पर्धेची दोन विजेतीपदे मिळविली. युरोपियन कप, कोप्पा इटालिया या स्पर्धाही त्याने युव्हेंटसकडून खेळताना जिंकल्या. त्यानंतर देशासाठी खेळताना विश्वकरंडक स्पर्धेतील त्याच्या सहा गोलने त्याला राष्ट्रीय हिरो केले. रोस्सीने १९८२च्या विश्वकरंडक स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात ब्राझीलविरुद्ध हॅटट्रिक नोंदविली. त्यानंतर उपांत्य फेरीत पोलंडविरुद्धच्या २-० विजयात दोन्ही गोल त्यानेच केले. अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीवर इटलीने ३-१ असा विजय मिळवून विजेतेपद मिळविले. या सामन्यात इटलीचे खाते उघडले होते.