Bhosari

फुगेवाडीत गर्भवती पत्नीचा खून करुन पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

By PCB Author

August 26, 2019

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करत पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास फुगेवाडी येथे घडली.

पूजा घेवंदे (वय २५) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून प्रवीण घेवंदे (वय २८) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडल्यासारख वागत होता. त्यामुळे माहेरी बाळंतपणासाठी गेलेली पूजा ही रविवारी औरंगाबाद येथून आईला सोबत घेऊन पतीला भेटण्यासाठी आली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती फुगेवाडी येथे पोहचली. यानंतर अनेक दिवसांनी आलेल्या आईला तिची साडेतीन आणि दोन वर्षाची मुल बिलगली व तिच्या जवळ बसली होती. यावेळी बेसावध असलेल्या पूजाच्या मानेवर अचानकपणे पती प्रवीणने उलट्या कुऱ्हाडीने जोरदार प्रहार केला. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. शिवाय या घटनेत एका मुलाला कुऱ्हाडीचा दांडा लागल्याने त्यालाही दुखापत झाली. घटनेनंतर प्रवीणने स्वतःवर देखील धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी पोलीस तपास करत आहेत.