फसवाफसवी करू नका; नाहीतर आम्हालाही कळतं काय करायचं ते… उद्यनराजेंचा पवारांना इशारा

1646

सातारा, दि. २२ (पीसीबी) – ‘शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांना भेटण्यात गैर काही नाही. पण त्यांनी फसवाफसवी करू नये. नाहीतर आम्हालाही कळतं काय करायचं ते,’ असा सूचक इशारा साताऱ्याचे खासदार उद्यनराजे भोसले यांनी दिला आहे.

उद्यनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. मात्र, जिल्ह्यात काम करताना ते पक्षाला फारसे जुमानत नाहीत. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी त्यांचे पटत नाही. ते भाजपच्या वाटेवर असल्याची अफवाही मधल्या काळात उठली होती. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाचे तिकीट देऊ नये, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. उदयनराजे पवारांच्या गाडीतही बसले. या भेटीबद्दल पत्रकारांनी विचारले असता उदयनराजे यांनी स्पष्ट काहीही बोलण्यास नकार दिला.

‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. या वयातही ते तरुणाला लाजवेल इतकी धावपळ करतात. अशा नेत्याला भेटणे कोणालाही आवडेल. पण त्यांनी फसवाफसवी करू नये. नाहीतर आम्हालाही कळतंय,’ असेही उदयनराजे यांनी सांगितले. आगामी निवडणुकीबाबत निर्णय घेताना राष्ट्रवादीने आपल्याला गृहित धरू नये, असा इशाराच उदयनराजेंनी दिल्याचे बोलले जात आहे.