Maharashtra

फडणवीस यांना भेटणं अपराध आहे काय ? – संजय राऊत

By PCB Author

September 27, 2020

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : अखेर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं कबुल केलं आहे. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं. मात्र, आता स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली आहे. “मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यतील 2 वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

संजय राऊत म्हणाले, “मुळात माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट गुप्त नव्हती. आम्ही जाहीरपणे भेटलो. मी जेव्हा सामनासाठी शरद पवार यांची मुलखात घेतली, तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आम्ही सामानाच्या मुलाखतीसाठी भेटलो. मी राहुल गांधी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस या मुलाखती घेणार असं जाहीर केलं होतं. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यतील 2 वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही.”

दरम्यान, आज (26 सप्टेंबर) शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल 2 तास ही भेट झाली. या भेटीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले होते. ही भेट झाल्यानंतर सुरुवातीला संजय राऊत यांनी या भेटीचा इन्कार केला. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून स्पष्टपणे बाहेर पडताना दिसली. त्यामुळे या भेटीचं बिंग फुटलं.