Pune

फडणवीस पुणे शहरातून लढणार का, चंद्रकांत पाटील म्हणतात…

By PCB Author

August 20, 2022

पुणे, दि. २० (पीसीबी) : आगामी लोकसभा निवडणुकीला अडीच वर्षांचा कालावधी बाकी आहे. असे असताना सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. ब्राह्मण महासंघाने तसे पत्र भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लिहिले होते. याच मागणीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस हे कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांचा विचार हा कर्तृत्वाच्या आधारावरच झालेला आहे. त्यामुळे तशी मागणी कोणीही करू शकतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

ब्राह्मण महासंघाने काय मागणी केली आहे?  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी १९ ऑगस्ट रोजी जे. पी. नड्डा यांना पत्र पाठविले होते. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस कुशल राजकीय व्यक्तिमत्व असून ते भाजपाचे भविष्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला सक्षम नेतृत्त्व देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये जी काही दोन-तीन नावं आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्राधान्यक्रमाने घ्यावे लागेल. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना लिहिले होते.