फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही – राष्ट्रवादी  

0
895

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा उल्लेखच केलेला नाही. मुख्यमंत्री स्वतःचा कारभार पारदर्शक असल्याचे सांगतात. मात्र, प्रतिज्ञापत्रात त्यांनीच दोन गुन्हे लपवले आहेत.  त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही, याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आज (गुरुवारी) न्यायालयाने फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे.

मुख्यमंत्री स्वतःचा कारभार पारदर्शक असल्याचे सांगत आहेत. तर प्रतिज्ञापत्रात खोटे बोलूनही त्यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी कसा?, असा सवाल मलिक यांनी केला आहे. फडणवीस यांची निवड तर रद्द करेलच पण जे मुख्यमंत्री पारदर्शकतेबाबत गप्पा मारतात आणि माहिती लपवतात, त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.