फटाके विक्रेत्यांनो ही बंधने पाळा, अन्यथा…

0
241

पुणे, दि. २७ (पीसीबी) – दिवाळी अवघ्या आठवड्यावर येवून ठेपली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुणे प्रशासनाने दिवाळी संदर्भातील नियमावली काढली आहे. यामध्ये यावर्षी विदेशी फटाक्यांच्या विक्रीला पुणे शहरात पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना पोलिस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त कार्यालयाने दिवाळी सणासाठी फटाके विक्रीचे परवाने दुकानदारांना दिले आहेत. मात्र यामध्ये काही अटीही आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या आहेत. याबाबतची नियमावलीदेखील या दुकानदारांना दिली आहे. या दुकानदारांना 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत फटाके विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही नियमावलीमध्ये म्हटलं आहे.
नियमावलीनुसार, दुकानदारांना विदेशी फटाके विकता येणार नाहीत. तसेच मुदत संपलेले फटाके किंवा शोभेच्या दारूची विक्रीही दुकानदारांना करता येणार नाहीये. याशिवाय फटाकेविक्रीची मुदत संपल्यानंतर शिल्लक राहिलेले फटाके परवाना असलेल्या गोदामात परत करणे दुकानदारांना बंधनकारक असणार आहे.

दिवाळीमध्ये नागरिकांनाही काही नियमांचे पालन करावं लागणार आहे. फटाके विक्रीची परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी 50 मीटर अंतरात फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय आयुक्तलयाच्या परिक्षेत्रात कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटरच्या आत फटाके फोडण्यास आणि शोभेची दारू उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.