प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर प्रश्न

0
286

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार पद्धती परिणामकारक ठरत असल्याने आयसीएमआर आणि इतर केंद्रीय वैद्यकीय संस्थांनी परवानगी दिली होती. करोनावर रेमडेसिवीरसह इतर औषधी उपलब्ध झाल्यानंतरही प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. मात्र, यासंदर्भात आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. या तज्ज्ञांनी केंद्रीय वैद्यकीय सल्लागार, आयसीएमआर आणि एम्सच्या संचालकांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना लिहिलेल्या पत्रात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

“भारतात प्लाझ्माचा अवैज्ञानिकपणे आणि अतार्किकपणे वापर केला जात आहे. प्लाझ्मासंदर्भात करण्यात आलेल्या ताज्या संशोधनात आढळून आलेल्या पुराव्यानुसार प्लाझ्मा उचपार पद्धतीचा रुग्णावर कोणताही चांगला परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. तरीही भारतभरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचे प्लाझ्मा दात्यांचा शोध घेताना फरफट होत आहे,” असं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

प्लाझ्मा उपचार पद्धतीचा अतार्किकपणे वापर थांबवण्याचा सल्ला देण्याबरोबरच प्लाझ्माच्या अशा वापरामुळे करोनाचा धोकादायक विषाणू तयार होऊ शकतो असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे. “सध्या केल्या जात असलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे करोनाचा अति घातक विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. असा विषाणू निर्माण झाल्यास सध्याच्या महामारीच्या काळात तो पेट्रोल ओतण्यासारखाच ठरेल,” असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे.