प्रेयसीची हौसमौज पुरवण्यासाठी, तिला खुश ठेवण्यासाठी करायचा घरफोड्या

0
554
सांगली, दि.२६ (पीसीबी) – सांगलीमध्ये पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या एका चोराला अटक केली आहे. इस्लामपूर पोलिसांनी अटक केलेला हा चोर आपल्या प्रेयसीची हौसमौज पुरवण्यासाठी, तिला खुश ठेवण्यासाठी घरफोड्या करायचा अशी माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी मोटरसायकलवरुन पाठलाग करून घरफोड्या करणाऱ्या दरोडेखोराला ताब्यात घेतले आहे.
कुणाल शिर्के  असे या अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास शहरामध्ये गस्त घालणारे पोलीस हवालदार किरण मस्के आणि आलमगीर लतीफ यांना कुणालवर संक्षय आल्याने त्यांनी त्याचा मोटरसायकलवरुन पाठलाग करून पोलिसांनी या घरफोड्या करणाऱ्या दरोडेखोराला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ८२ हजारांची रोख रक्कम सापडली. पोलिसांनी खाकी वर्दी दाखवत “चोरी केल्यानंतर मी माझ्या प्रेयसीला चोरी करतानाचा किंवा ज्या ठिकाणी चोरी केली आहे त्या ठिकाणावरुन सेल्फी फोटो काढून पाठवत असे,” अशी कबुली कुणालने पोलिसांना दिली. कुणालकडून पोलिसांनी ८२ हजारांची रोख रक्कम, घरफोडीचे साहित्य ताब्यात घेतले आहे. इस्लामपूरबरोबरच सातारा सांगलीमध्येही अनेक ठिकाणी कुणालने घरफोड्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सध्या पोलीस कुणालची चौकशी करत असून अजून अनेक घरफोड्यांचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लवकरच कुणालने चोरी केलेला मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊ असा विश्वास पोलीस उप-अधीक्षक कृष्णा पिंगळे आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी व्यक्त केला आहे. न्यायालयासमोर कुणालला सादर करण्यात आले त्यावेळी त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.