Chinchwad

प्रेम संबंधास नकार दिल्याने हिंजवडी आयटी कंपनीतील तरुणीला गोळ्या घालण्याची धमकी

By PCB Author

November 11, 2018

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – प्रेम संबंधास नकार दिल्याच्या कारणावरुन हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणीला एका संगणक अभियंता तरुणाने रिव्हॉल्वरने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.५) ते शनिवारी (दि.१०) नोव्हेंबर  या दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जितेंद्र सोळंकी तात्कालीन (रा. शोनेस्ट टॉवर सोसायटी, वाकड. मूळगाव जोधपूर, राजस्थान) या संगणक अभियंता तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय तरुणी आणि आरोपी जितेंद्र हे दोघेही पूर्वी हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी जितेंद्र यांनी ‘तू माझ्याशी रिलेशन ठेव. माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणत तरुणीची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने त्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या जितेंद्र याने तरुणीला रिव्हॉल्वरने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा पाठलाग करीत तिच्या मोबाइलवर, व्हॉट्सअॅपवर फोन करून संबंध ठेवण्यासाठी दमदाटी केली. यावर पीडितेने वाकड पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार जितेंद्र याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.