प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा; राजीव गांधींवरील फलकाला मुंबई काँग्रेसचे प्रत्युत्तर    

0
2924

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे जमावाकडून होणाऱ्या हत्येचे जनक असल्याचे फलक दिल्लीत भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी लावले होते. भाजपच्या या कृतीला मुंबई काँग्रेसने  चोख प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने   माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देणारे फलक लावले आहेत.   प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा. हा संस्कारांचा फरक आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

तर बग्गांनी लावलेल्या फलकांना काँग्रेसचे प्रवक्ते प्रणव झा यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधींबाबतचे दोन्ही फलक शेअर केले आहेत.   त्यावर प्रिय भाजपा, काँग्रेस आणि तुमच्यातील अंतर पाहा. आणखी काही काळ वाट पाहा. जनता तुमच्या अहंकार आणि द्वेषाला लवकरच योग्य उत्तर देईल, हा संस्कारांचा फरक आहे, असे झा यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, २००२ च्या दंगलीवेळी काही खास करू न शकलेल्या त्या दिवंगत पंतप्रधानांना श्रद्धांजली देण्याचे काँग्रेसवर संस्कार आहेत. तर भाजपच्या कार्यालयाबाहेर देशासाठी प्राण देणाऱ्या दिवंगत पंतप्रधानाबाबत तिरस्कारात्मक फलक लावण्यात आले आहेत. यातून भाजपची तुच्छ मानसिकतेचे दर्शन होते, अशी टीका त्यांनी केली.