Desh

प्रियांका गांधी शोधताहेत लखनऊमध्ये घर!

By PCB Author

October 07, 2019

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) –  उत्तर प्रदेश काँग्रेसचे काही नेते पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत असल्याने काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी नाराज आहेत. याच कारणाने त्या पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी आता लखनऊमध्ये तळ ठोकण्याच्या तयारीत आहेत. अस म्हटलं जात आहे की प्रियांका गांधी लखनऊमध्ये घर शोधत आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रणनिती आखण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी लखनऊमध्ये राहून प्रियांका अधिकाधिक वेळ घालवू इच्छितात.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांच्या घराची शोधमोहिम लखनऊमध्ये जोरावर आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचं लखनऊमध्ये गोखले मार्गावर एक घर आहे. याचाही विचार होत आहे. २ ऑक्टोबरला जेव्हा प्रियांका लखनऊमध्ये गेल्या होत्या तेव्हा विमानतळावरून थेट गोखले मार्गावर गेल्या होत्या.

सर्वसाधारणपणे प्रियांका किंवा गांधी परिवारातील दुसरे सदस्य रायबरेलीत उतरतात, पण पक्ष नेत्यांचे म्हणणे असे आहे की लखनऊमध्ये घर असल्याने प्रियांका आणि पक्ष दोहोंची सोय होईल. प्रियांका यांनी असे निर्देश दिले आहेत की पक्ष दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याऐवजी नव्या चेहऱ्यांना राजकारणात आणण्यावर लक्ष केंद्रित करेल. केवळ आपल्या स्वार्थासाठी पक्षात येणाऱ्यांचं स्वागत करण्याऐवजी विचारधारेच्या स्तरावर विस्तार केला जाईल.