Desh

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी घरातून पळून आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर दोघांनी केला बलात्कार

By PCB Author

February 12, 2019

अमृतसर, दि. १२ (पीसीबी) – प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी घरातून पळून आलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर दोघा नराधमांनी बलात्कार केला. ही धक्कादायक घटना अमृतसरमधील एका हॉटेलात घडली. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तरुणीला लुधियानाला जाणाऱ्या बसमध्ये बसवले आणि घटनेबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.

पीडित तरुणीने लुधियानाला पोहोचल्यानंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. साहिब सिंह आणि बाबा अशी आरोपींची नावे आहेत.

पिडितेने दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी लुधियानामध्ये एका नातेवाईकाकडे आली असता आपली आणि प्रियकराची भेट झाली होती. यानंतर आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रियकराने ३ फेब्रुवारीला दिल्लीत लग्न करु असे सांगत तिला बोलावून घेतले होते. यासाठी तरुणीने घरातून दीड हजार रुपये चोरी करत ३ फेब्रुवारीला लुधियाना रेल्वे स्थानकावरुन बस पकडली. मात्र ट्रेन दिल्लीला न जाता फिरोजपूरला गेली.

तरुणीने फिरोजपूरमध्ये एका घरात रात्र घालवली. तेथील एका चांगल्या व्यक्तीने तिला घरात आसरा दिला होता. यानंतर तिने फिरोजपूरमधून ट्रेन पकडली जी तिला अमृतसरला घेऊन गेली. तरुणीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर रेल्वे स्थानकावर तिने रिक्षाचालक साहिब याला दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनबद्दल विचारले. यावेळी त्याने ट्रेन सकाळी मिळेल असे सांगत हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने आणि त्याचा मित्र बाबा याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक करु अशी माहिती दिली आहे.