प्रियंका गांधींच्या टीममध्ये कोल्हापुरातील ‘या’ मराठमोळ्या कार्यकर्त्याची वर्णी

0
720

कोल्हापूर, दि. २० (पीसीबी) – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये एका मराठमोळ्या कार्यकर्त्याची वर्णी लागली आहे. कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांच्यावर उत्तर प्रदेश पूर्वच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पूर्वसाठी तीन जणांची सहप्रभारी म्हणून निवड केली आहे. त्यात खाडे यांचा समावेश आहे.  

करवीर तालुक्यातील सांगरूळ या गावाचे बाजीराव खाडे  असून ते १९९६ पासून  काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी  राजीव गांधी पंचायत राजमध्ये काम केले आहे.  त्याचबरोबर  तेलंगणाचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.  नुकतीच  त्यांची काँग्रेसच्या जाहीरनामा प्रदेश समितीवर नियुक्ती  केली आहे.

एमएससी अॅग्री, एमबीए शिक्षण घेतलेले खाडे यांना शासनाने कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरवले आहे. यशवंत बँकेचे संचालक आणि कुंभी कासारी परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक यांच्या न्यायासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. खाडे यांना  निवडीचे पत्र काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिले. तसेच या टीममध्ये जुबेर खान आणि कुमार आशिष यांचाही समावेश केला आहे.