प्रियंका गांधींचा बंगला या भाजप खासदारला मिळणार

0
241

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना लोधी इस्टेटमधील बंगला रिकामा करण्यासाठी मोदी सरकारने नोटीस बजावली आहे. त्यांना 1 ऑगस्टपर्यंत बंगला रिकामा करायचा आहे. त्यांचा बंगला भाजपच्या राज्यसभा खासदाराला देण्यात आल्याची माहिती आहे. लोधी रोडवरील प्रियंका गांधींचा बंगला भाजप खासदार आणि राष्ट्रीय मीडिया सेल प्रभारी अनिल बलुनी यांना वैद्यकीय कारणास्तव देण्यात आला आहे.

अनिल बलुनी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. 10 मार्च 2018 रोजी त्यांना उत्तराखंडमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. अनिल बलुनी यांच्या विनंतीनंतर त्यांना प्रियंका गांधी यांना दिलेला बंगला देण्यात आला आहे. प्रियंका यांनी बंगला रिकामा केल्यावर बलुनी यांना त्याचा ताबा मिळेल. बलुनी यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या निवासस्थानामध्ये बदल करण्याची विनंती केली होती. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचारानंतर ते बरे झाले असले तरी त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांचे सध्याचे निवासस्थान त्यांच्यासाठी पूर्णपणे योग्य मानले जात नाही.

एसपीजी सुरक्षेमुळे 2000 मध्ये प्रियंका गांधी यांना हा बंगला मिळाला होता. 21 मे 1991 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गांधी कुटुंबाला एसपीजी संरक्षण देण्यात आले होते. परंतु गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली होती. हा बंगला रिकामा करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने प्रियंका यांना नोटीस बजावली आहे. लोधी इस्टेटला 6-बी घर क्रमांक 35 मध्ये प्रियंका गांधी कुटुंबियांसमवेत राहतात. जवळपास गेल्या दोन दशकांपासून त्यांचे या घरात वास्तव्य आहे. प्रियंका गांधींनी आता लखनौला जाण्याचा विचार केला आहे. इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचे घर ‘कौल हाऊस’ ची डागडुजी करण्याचे काम यापूर्वीच झाले आहे. लखनौमधील या घरात प्रियंका राहणार आहेत.