प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा आयोगाला सादर; पुढील आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता

0
342

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कागदोपत्री सविस्तर माहिती समाविष्ट करुन महापालिका प्रशासनाने अखेर प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. हा आराखडा सर्वांसाठी पुढील आठवड्यात प्रसिद्ध केला जाण्याची दाट शक्यता आहे. हरकती, सूचना मागविल्या जातील आणि त्यावर सुनावणी घेण्याची प्रक्रिया जानेवारी अखेर पूर्ण केली जाईल, असे सूत्रांकडून सांगितले जाते. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणा-या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यानुसात महापालिका प्रशासनाने तयार केलेला आराखडा 6 डिसेंबर 2021 रोजी पॅनड्राईव्हमध्ये आयोगाला सादर केला. त्यावर 11 डिसेंबर रोजी आयोगासमोर सादरीकरण झाले. आयोगाने सुचविलेले बदल महापालिकेकडून करण्यात आले. आरक्षण निश्चितीकरिता प्रगणक गट (ब्लॉक)ची लोकसंख्या, भौगोलिक सीमा याची कागदोपत्री सविस्तर माहिती समाविष्ट करुन प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव 6 जानेवारी 2022 पर्यंत सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. पण, त्याला 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानुसार प्रशासनाने सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत, निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारुप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र अशी सविस्तर कागदोपत्री माहितीचा प्रस्ताव तयार करुन आज आयोगाला सादर केला.

”सविस्तर माहितीचा कागदोपत्री प्रस्ताव आयोगाला सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर मुंबईला गेले असून आज सादर करतील”, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.