Pimpri

प्राधिकरण संपादित तीन गुंठेपर्यंतच्या जागा गोरगरीबांच्या मालकी हक्काच्या करा – आमदार जगताप

By PCB Author

October 27, 2018

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – प्राधिकरणाने संपादित केलेल्या अनेक जागा सर्वसामान्यांनी एजंट लोकांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी केलेल्या आहेत. अशा तीन गुंठेपर्यंतच्या जागा संबंधित नागरिकांच्या मालकी हक्काचे करून द्यावेत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना शनिवारी (दि. २७) मागणीचे निवेदन दिले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित होते.

प्राधिकरणासाठी शहराच्या भागात जमिनींचे संपादन करण्यात आले. परंतु, संपादित जमिनींवर फलक किंवा सीमाभींत न बांधल्यामुळे काही एजंट लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. अनेक गोरगरीब नागिरकांना प्राधिकरणाच्या संपादित जमिनी बाजारभावाप्रमाणे विकण्यात आल्या आहेत. जमिनी घेताना त्या प्राधिकरणाच्या आहेत, हे त्या सर्वसमान्यांना कळले नाही. परंतु, जमिनी मालकी हक्काच्या होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे प्राधिकरणाने अशा प्रकरणांत लक्ष घालून फसवणूक झालेल्या गोरगरीबांना न्याय देण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरणाने संपादित केलेल्या पण एजंटकडून खरेदी केलेल्या तीन गुंठेपर्यंतच्या जमिनी संबंधित गोरगरीब नागरिकांच्या मालकी हक्काचे करून द्यावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली.