Banner News

प्राधिकरण पिंपरी-चिंचवडमध्ये हेलिपॅड, संविधान भवन आणि औद्योगिक संग्रहालय उभारणार; अर्थसंकल्पात खर्चाची तरतूद

By PCB Author

January 22, 2019

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा २०१९-२० या आगामी आर्थिक वर्षाचा ६७९ कोटी ८९ लाख ८६ हजार रुपयांचा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेत मंगळवारी (दि. २२) सादर करण्यात आला. ५ कोटी २७ लाख २५ हजार रुपये शिल्लकीचा हा अर्थसंकल्प आहे. मोशीतील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हेलिपॅड उभारणे, जेआरडी टाटा यांच्या नावाने औद्योगिक संग्रहालय उभारणे, पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारणे आणि पेठ क्रमांक ५ व ८ मध्ये सोलर पार्क उभारणे ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी प्राधिकरणाच्या सभेपुढे हा अर्थसंकल्प सादर केला. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणाचा ५ कोटी २७ लाख २५ हजार रुपयांचा शिल्लकीचा आणि एकूण ६७९ कोटी ८९ लाख ८६ हजार रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. त्यात ५९२ कोटी ४९ लाख रुपये भांडवली खर्च आणि ८२ कोटी १३ लाख रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. प्राधिकरणाचे मुख्य लेखापाल भगवान घाडगे यांनी हा अर्थसंकल्प तयार केला आहे.

आगामी वर्षाच्या या अर्थसंकल्पात पेठ क्रमांक ६, १२, ३० व ३२ येथे गृहप्रकल्प उभारण्यासाठी ३२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जेआरडी टाटा यांच्या नावाने औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्र व ओपन जिम बांधण्यासाठी ८ कोटी रुपये, पेठ क्रमांक ५ व ८ येथे सोलर पार्क उभारण्यासाठी १ कोटी रुपये, मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हेलीपॅड उभारण्यासाठी १ कोटी रुपये, वाल्हेकरवाडीतील चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस २४ मीटर रस्त्यासाठी ५ कोटी रुपये आणि पेठ क्रमांक २५ मधील सांस्कृतिक भवन बांधणे व दुरूस्तीसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.