प्राधिकरणातील गणेश तलावातील गाळ काढण्याची मनसेची मागणी

0
503

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावात गाळ, शेवाळ, गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे डासांची पैदास होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या तलावातील गाळ काढण्यात यावा, अन्यथा गाळ स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात टाकण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता  सुनिल वाघुडे  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेश तलावात निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, यमुनानगर, त्रिवेणीनगर, काळभोरनगर या परिसरातील नागरिक आणि गणेश मंडळे गणेश मूर्तींचे विसर्जन करत असतात. दीड दिवसांच्या गणपतीपासून अनंत चतुर्थींपर्यंत गणेश मूर्तींचे या तलावात विसर्जन केले जाते. मात्र, गणेशोत्सव अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी या तलावाच्या परिसरातील स्वच्छता आणि गाळ काढण्यात आलेला नाही.

तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने  एक फूट सुध्दा पाणी नाही. तलावात  शेवाळ व गवत वाढले आहे. त्यामुळे  परिसरातील  नागरिकांना  डास आणि दुगर्धींचा  त्रास होऊ लागला आहे. तरी या तलावातील गाळ काढण्यात यावा, अन्यथा गाळ स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात टाकण्यात येईल, असा इशारा मनसेने या निवेदनात दिला आहे.

यावेळी मनसे नगरसेवक सचिन चिखले, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत दानवले, प्रभाग अध्यक्ष दिपेन नाईक, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, रोहीत शिंदे, सोमनाथ जिल्हेवार, सुशील पोतदार, प्रसाद मराठे, किरण दुबे आदी उपस्थित होते.