पिंपरी चिंचवड प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बन्सी गवळी यांनी पदभार स्विकारला

0
439

पिंपरी, दि.१ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बन्सी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज सकाळी आपला पदभार स्विकारला आहे. राज्य शासनाने गवळी यांच्या नियुक्तीचा आदेश सोमवारी (३०जून) काढला. दरम्यान, पदभार स्विकारल्याचे स्वतः गवळी यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव हे ३१ मे रोजी सेवा निवृत्त झाले. यादव रिटायर झाल्यानंतर त्यांच्या जागी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याकडे तात्पुर्ती जबाबदारी देण्यात आली होती. दोन महिने वसईकर यांच्याकडे पदभार होता तो आज सकाळी त्यांनी श्री.गवळी यांच्याकडे सुपूर्द केला.

आजवर श्री. गवळी यांनी मुंबई, ठाणे, रायगड परिसरात विविध शासकीय पदांवर काम केले. मुंबई चे अतिरिक्त जिल्हाधीकारी म्हणून बन्सी गवळी कार्यरत होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नियुक्ती ही महत्वाची समजली जाते.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून काही महत्वाचे निर्णय प्रलंबीत होते. महापालिकेला समांतर सत्ताकेंद्र म्हणून प्राधिकरणाकडे पाहिले जाते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार कामकाज चालते. महापालिकेतील भाजपच्या निरंकूश सत्तेला शह देण्यासाठी प्राधिरणाच्या सत्तेचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. त्याशिवाय प्राधिकरणातील भूखंडांचे वाटप, नवीन गृहप्रकल्प, वाढती अतिक्रमणे, पूर्वी पासूनची अतिक्रमणे नियमितीकरण, मूळच्या शेतकऱ्यांनी एकरी पाच गुंठे परतावा जमीन आदी महत्वाचे प्रश्न प्रलंबीत आहेत. मोशी येतील औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा विकास रखडलेला आहे. त्यादृष्टीने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बन्सी गवळी यांची नियुक्ती महत्वाची आहे.