प्राधिकरणाचा विकसित भाग महापालिकेत तर अविकसित भागाचा पीएमआरडीएत समावेश होणार; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मान्यता

0
217

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनडीटीए) विकसित असलेला भाग हा पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वर्षा या ठिकाणी झालेल्या बैठकीत तत्त्वत: मान्यता दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे पीसीएनडीटीएचे विलीनीकरण करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून पीएमआरडीएची तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेची हद्द विस्तारणार आहे.

पीएमआरडीएची स्थापना झाल्यावर एकाच भागात दोन प्राधिकरणे कशासाठी, असा सवाल करण्यात आला होता. त्यानुसार ‘लवासा’ या हिल स्टेशनला असलेला विशेष प्राधिकरणाचा दर्जा मागील दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला होता. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे विलीनीकरण पीएमआरडीएमध्ये करणे अपेक्षित होते. मागील काही वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू होता, त्यास आता यश मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, कारखान्याजवळच त्यांच्या निवासाची सोय होणे आवश्‍यक होते. याबाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ रोजी करण्यात आली.

पीसीनडीटीए हद्दीतील विकसित असलेला भाग हा पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पीएमआरडीएच्या हद्दीत समावेश करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नगरविकास विभागाच्या सचिवांनी याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहेत, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.