Pune

प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुरावे जपणे गरजेचे

By PCB Author

October 13, 2020

एअर मार्शल गोखले संस्कार भारतीच्या ‘विरासत का वैभव’ चे प्रकाशन संपन्न

पुणे,दि. १३ (पीसीबी) “आपली प्राचीन भारतीय संस्कृती आपल्या पुढच्या पिढ्यांनाही कळायला हवी. जगभरात भारतीय संस्कृती पोचवायची असेल तर त्यासाठी त्याचे पुरावे जपले पाहिजेत, हा विचार करण्याची वेळ आली आहे”, असे प्रतिपादन एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले. संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे वैभव उलगडणाऱ्या डॉ. गो. बं. देगलूरकर संपादित ”विरासत का वैभव’ या ग्रंथाचे प्रकाशन एयर मार्शल गोखले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रांत अध्यक्ष उस्ताद उस्मान खाँ, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, विवेक व्यासपीठचे महेश पोहनेरकर व संस्कार भारती चे प्रांत पदाधिकारी उपस्थित होते. जगप्रसिद्ध पुरातत्व संशोधक हरिभाऊ वाकणकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त संस्कार भारती पश्चिम प्रांताने विवेक व्यासपीठ यांच्या सहकार्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत या संग्राह्य ग्रंथाची निर्मिती केली आहे.

आपल्या पुरातन संस्कृतीचे पुरावे आपण जपून ठेवले नाहीत याची खंत व्यक्त करून गोखले म्हणाले, “विमानाचा शोध लागण्यापूर्वी दहा वर्षे आधी आपल्याकडे विमान तयार झाले होते. त्यावर चित्रपट सुद्धा निघाला होता. पण दुर्दैवाने आपल्याकडे त्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. हा `पुरावा` प्रकार आहे तो आपल्याला नेहमीच त्रास देतो. आयुर्वेदाचेही तसेच आहे. आपल्याकडे पेटंट नसतात म्हणून त्याला जगन्मान्यता मिळत नाही. हे सगळ्याच बाबतीत आहे. मेटलर्जी सुद्धा आपल्याकडे पुरातन आहे. पण काही काळाने त्याचा ऱ्हास झाला. यावर आपला परदेशी व्यवहार सुद्धा होत होता. पण आपण ते विसरून जातो. जेंव्हा पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतीला चांगले म्हणू लागतात तेंव्हा आपल्याला त्याचे महत्व वाटू लागते. भारतीय संस्कृतीबद्दल बाहेरचे लेखक जेंव्हा चांगलं काही लिहितात, तेंव्हा आपल्याला त्याचे महत्व पटते.” “डेक्कन कॉलेजशी माझा संबंध केंद्र सरकारचा प्रतींनिधी म्हणून पाच वर्ष आला, मला इतिहास आणि भूगोलाबद्दल कुतूहल होतं, त्यामुळे देश परदेशात मी फिरलो. अनेक मंदिरे, शिल्प, वेगवेगळ्या वास्तू पाहिल्यावर भारत किती वैभवशाली, सुजलाम सुफलाम आहे. संस्कृती किती प्राचीन आहे, हे समजले. या ग्रंथाचे अनेक पैलू आहेत. त्यासाठी जगभरात वारसा स्वरुपात असलेली भारतीय संस्कृतीची प्रचंड माहिती या ग्रंथाचे आणखी भाग काढून वाचकांसमोर आणावी, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी संपादक या नात्याने डॉ. देगलूरकर यांनी ग्रंथाच्या कामाचा आढावा घेतला, ते म्हणाले, “ग्रंथ निर्मितीचे हे काम ऐतिहासिक झाले आहे. आपला प्राचीन संस्कृतीचा हा ठेवा आहे, तो सर्वांना चालना देणारा, चैतन्य निर्माण करणारा आणि ओढ निर्माण करणारा आहे. त्याच बरोबरच अंतर्मुख करणारा आणि आपल्याला दोष देणारा सुद्धा आहे. आपल्या पूर्वजांनी काय वैभव निर्माण केलं आहे ते डोळाभरून बघाव, वाचावं असं हे पुस्तक आहे. यातील लेखन `चित्रवत` आणि चित्रे `बोलकी` आहेत. भारत असा देश आहे की, येथे संस्कृतीचा प्रवाह सतत चालू आहे. काही लोक ही संस्कृती सनातन आहे, जुनी आहे म्हणून आपल्या संस्कृतीला नावे ठेवतात. पण, ‘सनातनम नित्य नूतनम’ हे त्यांना माहिती नाही. या ग्रंथात विनीता देशपांडे, धनलक्ष्मी टिळे, शलाका गोटखिंडिकर, मोहन शेटे, भाग्यश्री पाटसकर, प्रशांत तळणीकर यांनी माहितीचे लेखन केले आहे. सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पाटसकर यांनी आभार मानले.