प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन

0
609

पुणे, दि. २८ (पीसीबी) – प्रसिद्ध लेखिका आणि कवियित्री कविता महाजन यांचे निधन झाले आहे. त्या ५१ वर्षाच्या होत्या. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. साहित्य अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी होत्या.

५ सप्टेंबर १९६७ रोजी त्यांचा नांदेड येथे जन्म झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य विषयात एम.ए. केले होते.

प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. कादंबरी, कविता, बालसाहित्य, अनुवाद असे लेखनवैविध्य असणाऱ्या बंडखोर आणि तरल संवेदनशील साहित्यिका कविता महाजन यांना विनम्र श्रद्धांजली. अंबई : तुटलेले पंख, आग अजून बाकी आहे, आगीशी खेळताना, आबा गोविंदा महाजन : बालसाहित्य आकलन आणि समीक्षा, कुमारी माता, कुहू, ग्राफिटीवॉल ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. याशिवाय बकरीचं पिल्लू : जंगल गोष्टी, पाच पुस्तकांचा संग्रह हे त्यांचे नावाजलेले बालसाहित्य आहे.  तत्पुरुष, धुळीचा आवाज, म्रृगजळीचा मासा हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह आहेत.

महाजन यांना २००८ सालचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. तसेच कवयित्री बहिणाई पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना २०११ मध्ये साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार देण्यात आला होता.