प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची राजकारणात एंट्री; ‘या’ पक्षात करणार प्रवेश

0
383

पुणे, दि.१२ (पीसीबी) : ‘कारभारी दमानं’ म्हणत रसिकांना साद घालणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मागिल महिन्यात सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

सुरेखा पुणेकर यांना विधान परिषदेवर आमदार होण्याची इच्छा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. पण तेव्हापासूनच सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. अखेर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचा फड रंगवणार का? हे आगामी काळात पहायला मिळेल.

आजपर्यंत कलेची सेवा काली. आता राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळेच 16 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली.

सुत्रांच्या माहितीनुसार, राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचे नाव दिले होते. राज्यपालांच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीने शेट्टी यांचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या जागेवर सुरेखा पुणेकर यांची वर्णी लागणार का ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.