Banner News

“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे यांना अखेर जामीन मंजूर

By PCB Author

September 21, 2021

पिंपरी,दि.२१ (पीसीबी) – सणासुदीच्या काळात शहरातील खड्डे खोदाईला विरोधासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकाला काळी शाई फासण्याच्या आंदोलन प्रकरणात जेलमध्ये असलेल्या जेष्ठ नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे यांना अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शेंडगे यांच्यासह नऊ कार्यकर्त्यांनाही जामीन मिळाला असून सर्वांची सुटका झाली आहे.

गणेशोत्सव काळात कासारवाडी परिसरात खड्डेखोदाई सुरू करण्यात आली होती. सणासुदिच्या काळात नागरिकांना नाहक त्रास होणार म्हणून उत्सव संपल्यावर खोदाई करा, अशी साधीसरळ मागणी नगरसेविका शेंडगे- धाडगुडे यांनी केली होती. महापालिका प्रशासनाने त्यांची मागणी धुडकावत ठेकेदाराच्या बाजूने निर्णय देत खोदाई सुरूच ठेवली होती. वारंवार सांगूनही महापालिका प्रशासन दाद देत नसल्याने ९ सप्टेंबर रोजी नगरसेविका शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंता अशोक भालकर यांच्या कक्षात काळी शाई फेको आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कक्षाबाहेर निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. एका कार्यकर्त्याने अतिउत्साहाच्या भरात काळी शाई आयुक्त पाटील यांच्या नामफलकावर फेकली. त्यातून वातावरण बिघडले आणि पोलिसांनी शेंडगे यांच्यासह नऊ जणांना या प्रकऱणात अटक केली होती.

दरम्यान, शेंडगे -धाडगुडे यांच्यावरील कारवाईबाबत भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनीही नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहिर केले. धनगर समाजानेही शेंडगे यांच्यावरील कारवाई जाणीवपूर्वक असल्याचा आरोप करत प्रशासनाचा निषेध केला होता. नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलन केले म्हणून इतकी कठोर कारवाई केल्याबद्दल शहरातील सामाजिक संस्था, संघटनांनीही या महापालिका प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी (२० सप्टेंबर) रोजी सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली आणि शेंडगे- धायगुडे यांच्यासह सर्वांची जामीनावर सुटका कऱण्यात आली.