प्रशासकांचा सर्वसामान्य करदात्यांना ‘जोर का झटका’; कर सवलतीत केली कपात

0
467

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मालमत्ताकर आगाऊ भरणा-या करदात्यांना , महिला मालमत्ताधारकांना महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी ‘ जोर का झटका’ दिला आहे. सामान्य करात देण्यात येणारी कर सवलत पुढील आर्थिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ऑनलाईन कर भरणा करणा-यांना यापुढील काळात दहा टक्क्यांऐवजी केवळ पाच टक्केच करसवलत दिली जाणार आहे. या निर्णयाचा फटका सुमारे दीड लाख मालमत्ताधारकांना बसणार आहे.    

महापालिका करसंकलन विभागामार्फत इमारती आणि जमिनींवर करआकारणी केली जाते. मालमत्ताधारकांनी केळेत कर भरावा यासाठी प्रोत्साहनपर विविध करसवलती देण्यात येतात. महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तांना चालू आर्थिक वर्षातील सामान्य करात 50 टक्के सवलत दिली जाते. तर, मालमत्ताकराचा आगाऊ भरणा करणा-यांना सामान्य करात 10 टक्के सवलत दिली जाते. प्रशासक राजेश पाटील यांनी या कर सवलती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तांना सन 2023-24 मध्ये 30 टक्के तर सन 2024-25 मध्ये सामान्य करात 20 टक्के सवलत तसेच, मालमत्ताकराचा आगाऊ भरणा करणा-यांना सन 23-24 पासून सामान्य करात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय राजेश पाटील यांनी घेतला आहे.

नुकत्याच संपलेल्या सन 2021-22 च्या आर्थिक वर्षात 37 हजार 508 मालमत्ताधारकांनी आगाऊ कर भरून एक कोटी 55 लाखांची सवलत मिळविली होती. आगामी वर्षात त्यांना कर भरताना खिशाला झळ सोसावी लागणार आहे.  मालमत्ताकर ऑनलाइन भरल्यास 10 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. सन 2021-22 या आर्थिक वर्षात त्याचा लाभ एक लाख 53 हजार 206 मालमत्ताधारकांनी घेतला. यापुढील काळात ऑनलाईन कर भरणा करणा-यांना दहा टक्क्यांऐवजी केवळ पाच टक्केच करसवलत दिली जाणार आहे.