Maharashtra

प्रवीण गायकवाड,अमोल कोल्हे बारामतीत शरद पवारांच्या भेटीला !

By PCB Author

February 23, 2019

बारामती, दि. २३ (पीसीबी) – संभाजी बिग्रेडचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज (शनिवार)  बारामतीतील गोविंदबाग येथे  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हेदेखील उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.   

ही भेट सदिच्छा  होती,  असे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीमागे  आगामी निवडणुकीची किनार असल्याचे समजते. प्रवीण गायकवाड व अमोल कोल्हे यांच्या  एकत्रित भेटीमुळे  नवीन  राजकीय  सूत्रे जुळण्याची चर्चा सुरू झाली आहे.  बारामतीत डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सुरु आहे. त्यामुळे  कोल्हे  बारामतीतच  वास्तव्याला आहेत.

या भेटीदरम्यान शरद पवार यांना कोल्हे यांच्याकडून  महानाट्याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच छत्रपती संभाजी मालिकेबाबतही  सविस्तर माहिती घेतली.  दरम्यान, प्रवीण गायकवाड काँग्रेसकडून पुण्यातून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनीच राहुल गांधी यांच्याकडे गायकवाड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.